औरंगाबाद - महानगपालिकेचा वर्धापन दिन साजरा
करण्यासाठीही पालिकेच्या तिजोरीत पैसे नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे. येत्या
८ डिसेंबर रोजी औरंगाबाद महापालिकेचा ३६ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त
महापालिकेने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही. महपौर नंदकुमार
घोडेले यांनी नुकतीच मालमत्ता कर वसुली मोहिम राबवली आणि पालिकेच्या तिजोरीत
कोट्यवधी रुपये जमा केले. मात्र नागरिकांच्या करातून चालणाऱ्या पालिकेच्या वर्धापनदिनात
नागरिकांनाच सहभागी करुन घेतले जात नसल्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.
महापालिका
वर्धापन दिनाची पत्रिकाही नाही
महापालिकेने वर्धापन दिनानिमित्त ७ आणि ८ डिसेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र या कार्यक्रमाची पत्रिका अद्याप छापण्यात आलेली नाही. महापौर आणि आयुक्तांनी निर्धारित केलेल्या कार्यक्रमानुसार फक्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या क्रीडा स्पर्धा आणि गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. यात शहरातील सामान्य नागरिकांना सामावून घेता येईल असा एकही कार्यक्रम नाही. मागील वर्षी पालिकेने वर्धापन दिनानिमित्त मराठी नाटक, मुशायरा यांचे आयोजन केले होते. यानिमित्ताने शहरातील नागरिकांना सांस्कृतिक मेजवाणीचा आनंद घेता आला होता. मात्र यंदा नागरिकांना दूर ठेवण्याचाच कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे, का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
मुंबई, पुणे, नागपूर तसेच नाशिक महापालिका प्रशासन वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागरिकांचा
सहभाग राहील असे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. दोन, तीन दिवसांचा हा महोत्सव
आयोजित केला जातो. मात्र औरंगाबाद महापलिका याबाबत उदासीन दिसून येते. कामात
दिरंगाई करणारे अधिकारी आणि शहर विकास कामे करण्याचा केवळ बडेजाव करणारे
महापालिकेतील सत्ताधारी, पदाधिकारी यांनीही वर्धापन दिन साजरा करण्याबाबत कोणतेही
स्वारस्य दाखविले नाही. केवळ सर्वसाधारण सभेत आपापल्या वॉर्डापुरते ओरडणे आणि
कंत्राटदाराकडून मिळणाऱ्या टक्केवारीची ओरड करणारे भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी या
वर्धापन दिनासाठी कोणताही प्रश्न उपस्थित करू शकले नाही, याबाबत अनेक नागरिकांनी खंत
व्यक्त केली.
अनावश्यक खर्च
टाळला, महापौरांचा दावा
शहरातील सर्व विकास कामे मार्गी लावल्याचा केवळ फुसका दावा करणारे महापौर नंदकुमार घोडेले यांनी तर या वर्धापन दिनानिमित्ताने पहिले पाढे पंचाव्वन अशीच भूमिका घेतल्याचे दिसून आले. केवळ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी कार्यक्रम घेऊन महापौरांनी नरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना मोक्याच्या जागी बसवण्याचा महापौरांवर आरोप होत आहे. त्यापैकीच एक असलेले सांस्कृतिक विभागाचे प्रभारी असलेल्या अधिकाऱ्याने वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन केले नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे महापौरांचा दावा आहे की वर्धापन दिनासाठी अनावश्यक खर्च टाळला आहे.










